कै. ती. सौ. पद्मामावशीची श्रीसाई महाराजांवर खुप भक्ति होती आणि महाराजांची पण तिच्यावर कृपा होती. त्यामुळे ती गेल्यावर तिला त्यांच्या पायाशीच जागा मिळेल अशी मला श्रध्दा वाटली आणि त्यावरुनच मला ही कविता सुचली. हे तिच्या तोंडचेच शब्द आहेत अशी कल्पना इथे आहे ...
साश्रुपूर्ण नयनांनी तुम्हा सर्वांचा निरोप घेतेय
निघायची वेळ झाली माझी गाडी शिट्टी देतेय ।
पुनः पुन्हा डोळ्यात आणू नका पाणी
गेली बिचारी असे म्हणू नका कुणी ।
विरत चालल्या आहेत सर्व आठवणी
आता इथे माझे उरले नाही कुणी ।
गाडीने सोडले आहे ठिकाणं
पुसत चालली आहे एकेक खूणं ।
समोर दिसताहेत वळणदार वाटा
मऊशार माती इथे न काटाकुटा ।
फेसाळलेल्या समुद्रावरचा सुखद गार वारा
सोनेरी रेतीचा सभोवती किनारा ।
रंगबिरंगी फुलांचे तारवे फुललेले
सुगंधाच्या लाटेवरती मन माझे डोले ।
कवितेतल्या कल्पवृक्षांची गर्द गार सावली
ह्या गावाची हवा मला फारच बाई भावली ।
थांबू का जरा इथे, घेऊ का थोडा श्वास
नको! नको!! अत्त्युच्च सुखाचा मला लागाला आहे ध्यास ।
कसल्या तरी तेजाने उजळले आहे आकाश
दिसला! मला हवा तो दिव्य तेजस्वी प्रकाश ।
चिरंतन सुखाचं भांडार मला गवसलं
हाती आली माझ्या सद्गुरुंची पदकमलं ।
नको पुनर्जन्म, नको नाती-गोती
नको मोहमाया अन् पाप-पुण्यांची खाती ।
एकच मागणे देवा एकच द्यावा वर
पडू नये कधीही ह्या पाऊलांचे अंतर ।
- सुनंदा अभ्यंकर